सोलापूर : जिल्ह्यातील अकरा नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी बुधवार, ३ डिसेंबर रोजी होणार असून प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी शासकीय गोदामे, सभागृहे व कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडणार असून, मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या सुरळीततेसाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मतमोजणी केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात विविध निर्बंध लागू केले आहेत.
मतमोजणी केंद्रात निवडणूक कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. २०० मीटर परिसरात कोणतेही वाहन आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाइल फोन किंवा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांच्या आसपास घोषणाबाजी, मिरवणुका, गुलाल उधळणे, डिजिटल फलक लावणे किंवा वाहनांच्या पुंगळ्या वाजवून आवाज करण्यासही बंदी असेल. नियमभंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही आशीर्वाद यांनी दिला आहे.
- मतमोजणी केंद्रे पुढीलप्रमाणे :
- बार्शी : उपळाई रोडवरील शासकीय गोदाम
- पंढरपूर : शासकीय धान्य गोदाम
- अक्कलकोट : प्रियदर्शनी मंगल कार्यालय
- अकलूज : व्यायामशाळा क्रीडा संकुल
- सांगोला : अहिल्यादेवी होळकर सभागृह
- करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सांस्कृतिक भवन
- कुडूवाडी : वखार महामंडळाचे गोदाम
- मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम
- मोहोळ : शासकीय धान्य गोदाम
- दुधनी नगरपालिका : नगरपरिषद सभागृह
- मैंदर्गी नगरपरिषद नगरपरिषद कार्यालय






