सोलापूर : विजापूर रोडवरील दानम्मा देवी तसेच बाहुबली मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून ७ तासांच्या आत अटक करून त्यांच्याकडून १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश सुरेश पवार (वय २६, रा. नेहरूनगर, विजापूर रोड) आणि अश्पाक मौला शेख (वय २७, रा. थोरली इरण्णा वस्ती, विजापूर रोड) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नाव आहेत. तर करण ऊर्फ करण्या केंगार (रा. दमाणी नगर, सोलापूर) हा अद्याप फरार आहे.

विजापूर रोडवरील रेवणसिध्देश्वर मंदिरासमोरील दानम्मा देवी मंदिर आणि मंत्री चंडक पार्कसमोर असलेल्या बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी केली होती. दानम्मा देवी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे ६ हजार रुपयांची रक्कम चोरून नेण्यात आल्याप्रकरणी मंदिराचे पुजारी सिध्दय्या भद्रय्या हिरेमठ (वय ५५, रा. गणेश नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरात चोरी करतानाचे गुन्हेगार हे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातील गुन्हेगारांची पाहणी करून आरोपींची ओळख पटविली. चित्रीकरणातील गुन्हेगार हे सराईत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. आरोपी हे मोदी रेल्वे बोगदा येथे येणार असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावून आकाश पवार व अश्पाक शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये देव-देवतांच्या पंचधातूच्या ८ मूर्ती व रोख २ हजार रुपये मिळून आले. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांचा साथीदार करण्या केंगार याच्या मदतीने मंदिरात चोरी केल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड यांनी केले आहे..







