सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोन चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून तीन लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सूर्यकांत ऊर्फ चिन्या अनंत माने (वय ३४, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे) व राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३५, रा. वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
रेखा कैलास चौधरी (वय ३८, रा. अंबिका रेसिडेन्सी, कोटणीस नगर, विजापूर रोड) यांचे भरदिवसा घर फोडून सुमारे साडेचार तोळ्याचे २ लाख ४७ हजारांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांचे निदर्शनास आले. तसेच विशाल नगर परिसरातील पूनम सतिश वांगी (वय ४३) यांचेही घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २२ हजारांची रोकड, ६ ग्रॅमची सोन्याची दोन मंगळसूत्र व चांदीच्या आरतीअ सा सुमारे १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

दिवसा घरफोडीच्या दोन घटना नवरात्रौत्सव काळात घडल्याने गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदारांनी घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पथकाने सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची खात्री करुन आरोपींची ओळख पटविली. या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी सूर्यकांत माने हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली, त्याप्रमाणे त्यास तेथून अटक केली. तसेच दुसरा आरोपी राम क्षीरसागर यास अटक केली. या आरोपींकडून सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने, ६२ तोळे चांदीचे दागिने-वस्तू व गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल असा एकूण तीन लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड आदींनी केली.







