सोलापूर : पंधरा दिवसाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने मित्राच्या घरातील कपाटातून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून मौज मजा करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात जेलरोड पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या मुलांकडून चार लाख दहा हजार रुपये हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवार पेठ येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातील पाच लाख रुपये चोरीला गेल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात एक ऑक्टोबर रोजी दाखल झाली होती. या प्रकरणातील तपास करताना डीबी पथकातील साईनाथ यसलवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे यांना अल्पवयीन मुले मोटारसायकल खरेदी घेण्यासाठी पद्मशाली चौकात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर चोरी केल्याची कबुली दिली. यात त्या मुलांनी फिर्यादीच्या घरी त्यांच्या मुलासोबत खेळण्यासाठी आल्यानंतर कपाटातील रक्कम थोडी थोडी करून काढून घेतल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ४ लाख १० हजार रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कामगिरी जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार, सपोनि संदीप पाटील, शरीफ शेख, गजानन किणगिरी, एम. डी. नदाफ, हवा-लदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, भारत गायकवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, उमेश सावंत, साईनाथ यसलवाड, विठ्ठल जाधव, युवराज गायकवाड यांनी पार पाडली आहे.







