अनगर : अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ तालुक्यात मोठं राजकीय नाट्य रंगलं असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरताना अडथळे येत असल्याचा आरोप होत आहे. अखेर पोलिस संरक्षण मिळाल्यानंतर त्या पहाटेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. उज्ज्वला थिटे यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. उज्ज्वला थिटे या आज पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत सोलापूर ग्रामीण पोलिसांचा शस्त्रधारी ताफा होता. नगरपंचायत परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून कार्यालयाच्या चारही बाजूंनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यापूर्वीच मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यालयाबाहेर जमू लागले आहेत.



उज्ज्वला थिटेंचा आरोप
उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी असा आरोप केला की, भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी रस्त्यांवर जागोजागी अडथळे उभे केले जात आहेत. उसाचे ट्रॅक्टर रस्त्यावर लावून जाण्याचे मार्ग बंद केले जात आहेत. थिटे यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नादरम्यान, राजन पाटील यांच्या समर्थकांकडून पाठलाग केल्याचा आरोप थिटे यांनी केला. पोलिसांनी योग्य संरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशनबाहेर उभं राहून संतापही व्यक्त केला होता.
पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटे कार्यालयात पोहोचल्या
उज्ज्वला थिटे यांनी वाढत्या तणावाच्या परिस्थितीत पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आणि थिटे यांना सुरक्षा देण्यात आली. पोलिस बंदोबस्त तैनात झाल्यानंतर थिटे सुरक्षितपणे अनगरमध्ये पोहोचल्या आणि अर्ज दाखल करण्यास सज्ज झाल्या. आता त्या आपला अर्ज भरू शकतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







