\सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांना दिव्यांगांकरिता राखीव ठेवण्यात आलेला निधीचे तातडीने वाटप करावे, अशा प्रकारच्या सूचना जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचे डेप्युटी सीईओ भुजबळ यांनी दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्याचे आदेश असताना अनेक ग्रामपंचायतींकडून दिव्यांग निधी खर्च करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. म्हणून दिव्यांग निधीसाठी अनेक संघटनांनी ग्रामपंचायत विरोधात आंदोलन केला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीने डिसेंबर अखेरपर्यंत पाच टक्के दिव्यांग निधीचे वाटप करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिले आहेत.

दिव्यांगांना शासनाचा आधार म्हणून ग्रामपंचायतींकडून पाच टक्के निधी देण्याचा नियम असतानाही अनेक ग्रामपंचायतींकडून दुर्लक्ष जाणिवपूर्वक करण्यात येते. दिव्यांग निधी मिळविण्यासाठी दिव्यांगांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना आदेश देऊन डिसेंबर अखेरपर्यंत पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करण्याचे आदेश दिल्याने दिव्यांग बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.







