प्रा.डॉ. विकास पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘इंडो-थाई रिचर्ड फॅनमॅन एक्सलन्स पुरस्कार जाहीर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांना इंडो-थाई रिचर्ड फॅनमॅन एक्सलन्स पुरस्कार २०२६ हा अत्यंत प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅनो मटेरियल या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय आणि उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळणार आहे.
हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च फाउंडेशन इंडिया-थायलंड यांच्याकडून दिला जातो. विशेष म्हणजे, हा पुरस्कार नोबेल विजेते आणि जगात सर्वप्रथम नॅनोटेक्नॉलॉजीची संकल्पना मांडणारे महान शास्त्रज्ञ रिचर्ड फॅनमॅन यांच्या नावाने दिला जातो. यामुळे या पुरस्काराचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्रा. पाटील हे गेली सत्तावीस वर्षाहून अधिक काळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये नॅनो मटेरियल या विषयावर अथक संशोधन करत आहेत. या काळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून विविध पेटंट्स आणि संशोधन प्रकल्पही यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेत IMRF, थायलंड व भारत यांनी त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे.
१६ डिसेंबर २०२५ रोजी थायलंडमध्ये वितरण
हा सन्मान सोहळा दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी थायलंड येथील राजभट राजन गरींद्र विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत संपन्न होणार आहे. प्रा. पाटील यांना हा पुरस्कार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल अशा स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. विकास पाटील यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पुण्यश्लोक सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे, सर्व संकुलांचे संचालक, उपकुलसचिव डॉ. सूर्यकांत कांबळे, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







