सोलापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करावे, असे पत्र शासनाने काढले आहे. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक त्रुटीमुळे ई-केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणींचे टेंशन वाढले आहे. मात्र, लवकरच वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु पोर्टलवर ई-केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे.
या वेबसाईटवर करा ई-केवायसी
पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी (https://ladakibahin.maharashtra.gov.in)) या वेब पोर्टलवर ई-केवायसी करावी. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ देण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
पोर्टलवर एरर
ई-केवायसीचे आदेश मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींकडून तत्काळ ई-केवायसी करण्यासाठी विविध नेट कॅफे, ऑनलाईन दुकाने, मोबाईलवरून ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागितली जाते. मात्र, येथेच एरर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यास अडचण येत आहे.







