सोलापूर, : शहरातील मुराजी पेठेतील आप्पाजी नगर परिसरातून चोरीला गेलेल्या कारच्या तपासादरम्यान फौजदार चावडी पोलिसांनी आंतरराज्य वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १५ दिवसांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी तेलंगणातून एका अट्टल वाहनचोराला अटक करत १४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुराजी पेठ परिसरातून कार चोरीची घटना घडल्यानंतर फौजदार चावडी पोलिसांच्या डी.बी. पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि वाहनांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांनी सोलापूर ते तेलंगणा सीमेपर्यंत तपासाची साखळी जोडली. आरोपीने चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक प्लेट लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तपास पथकाने वाहनाचा मूळ क्रमांक शोधून आरोपीपर्यंत मजल मारली.

तपासादरम्यान निजामाबाद (तेलंगणा) येथून महमद शेख (वय ३२) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदार हजरत खान (रा. कुर्ला, मुंबई) याच्या मदतीने सोलापूर, तुळजापूर, अकोला आणि शिरपूर परिसरातून वाहने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची वाहने आणि अन्य साहित्य असा एकूण १४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे विविध जिल्ह्यांतील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, अजय चव्हाण, विनायक जाधव, जगदीश हुल्ले, रवि धेंडे, पंकज घाडगे, नानासाहेब सलगर आणि चालक पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली.

चोरट्यांची अनोखी पद्धत
वाहनचोरीसाठी आरोपी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने कारची काच फोडत असत. त्यानंतर विशेष इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून काही क्षणांत वाहन सुरू करून तेथून पसार होत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या आधुनिक पद्धतीमुळे वाहनमालकांसह पोलिसांनाही मोठे आव्हान निर्माण झाले होते.











