सोलापूर, : सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीने आता चांगलाच राजकीय रंग धरला आहे. सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीत बँकेवरील वर्चस्वासाठी राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. एका बाजूला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले जात असतानाच दुसऱ्या बाजूला मोहिते-पाटील कुटुंबाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ संचालकपदापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
निवडणूक प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २७) तब्बल ३९ व्यक्तींनी १२३ उमेदवारी अर्जांची खरेदी केली. इच्छुक उमेदवारांसह त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यालयात वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच व्यक्तींनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मोहिते-पाटील कुटुंबाचा हा वाढता सहभाग महाविकास आघाडीच्या संभाव्य पॅनलच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या विविध राजकीय नेत्यांची मोट बांधून भाजपसमोर सक्षम पर्याय उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी स्वतंत्र पॅनल उभे करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपनेही या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राजकीय पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार की राजकीय ताकदीची थेट चाचपणी होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी प्रत्यक्षात सहा इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील पाच, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका उमेदवाराचा समावेश आहे. अर्ज खरेदीच्या तुलनेत प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्याचे प्रमाण कमी असले तरी शेवटच्या दोन दिवसांत इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण कोणाच्या गोटात जाणार, कोणत्या नेत्याला कोणत्या गटातून उमेदवारी मिळणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, यावर आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. विशेषतः अर्ज माघारीच्या टप्प्यानंतरच निवडणुकीतील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याची राजकीय हालचाल पाहता जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेचा संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदारनिहाय प्रवर्ग अर्ज दाखल केलेली नावे
सिद्धेश्वर अवताडे (नागरी बँका पतसंस्था)
सुशील अवताडे (पणन कृषी)
सुशील बबन अवताडे (वि.का. कार्यकारी सोसायटी)
सिद्धेश्वर अवताडे (वि.का. कार्यकारी सोसायटी)
बबन अवताडे (वि.का. सोसायटी, मंगळवेढा) तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील
श्रीदीप हसापूरे (दक्षिण सोलापूर तालुका – वि.का. सोसायटी)
हे सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.