
सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे (एमएसईबी) प्रमुख व्यवस्थापकीय संचालक (एमडी) औंडीकर यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान आदिवासी पारधी समाजाच्या वतीने त्यांचा बालाजी सरोवर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील आयटीआय उत्तीर्ण व एमएसईबीमध्ये इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या युवक-युवतींच्या रोजगाराचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील अनेक तरुण व तरुणींनी शासनमान्य आयटीआय परीक्षा उत्तीर्ण होऊन एमएसईबी विभागात इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण केला आहे. मात्र दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांना अद्याप नोकरीत सामावून घेण्यात आलेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या संदर्भात भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांनी ९ जून २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी एमएसईबी विभागाशी पत्रव्यवहार करूनही संबंधित युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळाली नव्हती.

दरम्यान, हा विषय एमडी श्री. औंडीकर यांच्या समोर मांडण्यात आला. त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांनी उपस्थित असलेल्या एमएसईबी सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील माने यांना संबंधित युवक-युवतींना तातडीने नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या निर्णयामुळे आदिवासी पारधी समाजातील आयटीआय व अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका राजश्री चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळणार असल्याची भावना समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सत्कार समारंभास सामाजिक कार्यकर्ते अनिल भि. चव्हाण, सिद्धाराम चव्हाण, सुमित चव्हाण, आशुतोष चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.












