सोलापूर : वडाळा (ता. उत्तर सोलापूर): श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान अंतर्गत संचालित लोकमंगल नर्सिंग कॉलेज, वडाळा येथे अग्निसुरक्षा जनजागृती आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने फायर एक्स्टिंग्विशर (अग्निशामक यंत्र) वापराचे प्रात्यक्षिक व मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तज्ज्ञ प्रशिक्षकांनी आग लागल्यास घाबरून न जाता योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विविध प्रकारच्या आगी ओळखून त्यानुसार योग्य अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

अग्निसुरक्षेसाठी PASS (Pull – Aim – Squeeze – Sweep) या पद्धतीचे महत्त्वही सहभागीांना समजावून सांगण्यात आले. मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे, सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे, स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपणे तसेच अग्निशामक यंत्राचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचे सराव उपक्रम आपत्ती व्यवस्थापनातील तयारी आणि समन्वय वाढविण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.

महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता विकसित व्हावी आणि अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. उपस्थित सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचा संकल्प केला.











