सोलापूर, : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या आदेशानुसार १ ते ९ जुलै या कालावधीत शहरातील सर्व आठ झोनमधील २६ प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेत लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, नाले, पदपथ, खुल्या जागा, बाजारपेठा आणि शासकीय परिसरांची विशेष स्वच्छता करण्यात आली. यामध्ये कचरा संकलन, दगड-माती व मलबा हटविणे, अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स काढणे, झुडपे व गवत हटविणे, रस्ते धुणे तसेच डिव्हायडरची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले. या कालावधीत शहरातून सुमारे ९८.५ टन कचरा उचलण्यात आला, तर १९०.५ ब्रास दगड, माती व मलबा हटविण्यात आला. यासाठी जेसीबी, डंपर, घंटागाड्या आणि पाणी टँकरचा वापर करण्यात आला.
या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील सार्वजनिक परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित होण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. तसेच सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.