No Result
View All Result
सोलापूर : शिक्षक व पदवीधरमतदारसंघाच्या निवडणुकीमुळे शहरात आचारसंहिता लागू असल्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांचा राबता महापालिकेत कमी झालेला होता. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दुपारपासून महापालिका पदाधिकाऱ्यांचा राबता वाढला आहे. आचारसंहिता संपल्यामुळे प्रलंबित कामांना आता मुहूर्त लागणार आहे.
आचारसंहिता संपुष्टात आल्याने १५ सप्टेंबर रोजी तहकूब करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा आता नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. बाळीवेस येथील अर्धवट अवस्थेतील रुग्णालय, नालेसफाई, शहरातील खड्डे, परिवहन समिती सदस्य निवड, कायम कर्मचाऱ्यांचा विषय, होटगी रस्त्यावरील प्रलंबित कामे, तेलंगी-पाच्छा पेठ परिसरातील जुन्या पुलांचा प्रश्न तसेच प्रलंबित जलवितरण आराखडा यांसारखे महत्त्वाचे विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. शहरातील अक्कलकोट रोड आणि होटगी रोड औद्योगिक वसाहतींमधील ४४ रस्त्यांच्या विकासासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून अक्कलकोट रोड एमआयडीसीतील ३५, तर होटगी रोड एमआयडीसीतील ९ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ४६ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झालेली आहे.
स्वीकृतच्या निवडी होणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आचारसंहितेमुळे विषय थांबला होता. आता जिल्हा परिषदेत १० सदस्यांमागे एक असे ७ स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार आहेत. पंचायत समितीतही पाच सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य ठरणार आहे. आता आचारसंहिता संपल्याने दि. ५ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर १२ तारखेला सर्वसाधारण सभा होणार आहे. येणाऱ्या काळात जलसंधारणाची कामे आणि व्ही राम योजनेतील कामे निश्चित करून पुढील सहा महिन्यांचे नियोजन होणार आहे. त्याशिवाय १५ व्या आणि १६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विषयही थांबला होता. आता त्याही विषयाला मंजुरी मिळणार आहे.
डीपीसी : मार्ग मोकळा
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडील प्रलंबित कामांच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. नियोजन समितीने एकूण ८४२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. यातील २१८ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे विविध विभागांची १०० कोटींहून अधिकची कामे प्रलंबित राहिली आहेत. या सर्व कामांचे प्रस्ताव नियोजन समितीला सादर झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी आचारसंहिता संपल्यानंतर नियोजन समितीकडून प्रस्ताव मागविले आहेत. जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे
No Result
View All Result