सोलापूर : श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे बुधवारी (२९ जुलै) साजरी होणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी भाविकांची संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेऊन, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वटवृक्ष मंदिरात दर्शनाच्या वेळेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिनही विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी बुधवारी रात्री २ वाजताच मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले केले जाणार आहेत. मंदिरात पहाटे ४ वाजता नित्यनियमाप्रमाणे काकड आरती होईल. मात्र, गर्दीच्या पार्श्वभूमीवर या दिवशी भाविकांचे नियमित अभिषेक बंद ठेवण्यात आले आहेत. अभिषेकाची पावती फाडणाऱ्या भाविकांना अंगारा-प्रसाद देण्यात येईल. सकाळी ११ वाजता नैवेद्य आरती, तर सायंकाळी ७.५० ते रात्री ८.३० या वेळेत श्रींची शेजारती पार पडेल. दुपारी १२ ते ३ या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांच्या दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा, बॅरिकेडिंग, चोख पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय सेवा आणि ज्येष्ठांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.दुसरीकडे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादालय, शिवस्मारक, यात्री निवास आणि परिसरातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मागील दहा दिवसांपासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असून राज्यभरातील नामांकित कलावंत, मान्यवर सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत महाप्रसादगृहात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण आणि त्यानंतर नामस्मरण व गुरुपूजा पार पडेल. सकाळी १० वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि अन्य निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका, पालखी आणि रथाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. पुण्यातील ‘नादब्रह्म’ व मुंबईतील ‘आराध्या’ ढोलपथकांच्या निनादात आणि अमोलराजे लेझीम संघाच्य खेळाने मिरवणुकीची रंगत वाढणार आहे. आमदार शेखर निकम, बाळासाहेब दाभेकर, शहाजीराजे पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या मिरवणुकीचा शुभारंभ होणार आहे. या संपूर्ण उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान समिती, स्थानिक प्रशासन, पोलीस दल, विविध सामाजिक संस्था विशेष सहकार्य लाभत आहे, अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी दिली.