शांतता समिती बैठकीत कडक नियम; ऑनलाईन परवानगी सक्तीची, रात्री १० नंतर साऊंडला ब्रेक
सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक नियोजन केले आहे. जयंती उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सव मंडळांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

जयंती उत्सवासाठी सर्व मंडळांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही नागरिकाकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मंडप उभारताना आपत्कालीन सेवांसाठी रस्ते मोकळे ठेवणे, सुरक्षेच्या दृष्टीने २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती करणे आणि महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक राहणार आहे. ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मध्यवर्ती मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

यंदाच्या जयंती उत्सवात ध्वनिक्षेपकासाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. मागील वर्षी विशेष बाब म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती. मात्र यंदा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, गुन्हे उपायुक्त अश्विनी पाटील, वाहतूक सहाय्यक आयुक्त सुधीर खिराडकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासकीय प्रतिनिधी, मातंग समाजातील युवा नेते आणि विविध उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












