74 बेड्सचा आंतररुग्ण विभाग कार्यरत; 67 तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा, कॅथलॅब व नवजात शिशु आयसीयूही लवकरच
सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलने गेल्या एका वर्षात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचे लोकार्पण रविवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सध्या हॉस्पिटलमध्ये 74 बेड्सचा आंतररुग्ण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून तीन आयसीयूमधील 30 बेड्स, 12 वातानुकूलित खोल्या, सहा स्पेशल रूम, प्रसूती विभाग, कॅज्युअल्टी तसेच सुसज्ज वॉर्ड रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. शहरातील तब्बल 67 तज्ज्ञ डॉक्टर विविध शाखांमध्ये सेवा देत असल्याने रुग्णांना एकाच ठिकाणी दर्जेदार उपचार मिळत आहेत.डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेली चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स ही वाडिया हॉस्पिटलची मोठी उपलब्धी ठरणार आहे. तसेच एलआयसी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या मदतीने जर्मनीहून मागविण्यात आलेला कार्ल झाईस कंपनीचा अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाला आहे.आठ बेड्सचे आधुनिक डायलिसिस सेंटर, सात व्हेंटिलेटर्स, तीन एक्स-रे मशीन, तीन सोनोग्राफी मशीन, मेडिकल गॅस पाइपलाइन आणि मल्टीपॅरा मॉनिटर्स यांसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णांसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. कॅथलॅब, अत्याधुनिक कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु आयसीयू आणि कॅन्सर निदान व उपचार केंद्रही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.











