सांगोला, दि.8- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरू असून, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शास्त्रीय नृत्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले.या नृत्य स्पर्धेत विविध 10 महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक भरतनाट्यम, कत्थक आणि कुचिपुडी अशा विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांनी झाली. प्रत्येक नृत्य सादरीकरणाने कलाप्रेमींना मंत्रमुग्ध केले. मंगळवेढ्यातील दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाच्या तृप्ती अण्णे हिने तिच्या प्रभावी नृत्य सादरीकरणातून रसिकांची वाहवा मिळवली. तिने सादर केलेल्या नृत्याने नृत्यकलेतील बारकावे आणि शिस्त यांचा सुंदर मिलाफ साधला.

सोलापूरच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील रुची रायबागकर हिने सादर केलेल्या नृत्यातील भावपूर्ण अभिव्यक्ती आणि नेमकी पदन्यास रचना लक्षणीय ठरली. त्याचबरोबर कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर येथील मानसी गांधी हिने देखील अत्यंत सुरेख आणि नजाकतीने सजलेला नृत्याविष्कार सादर केला. कॉलेज ऑफ फार्मसी, दयानंद महाविद्यालय, सिंहगड कॉलेज सोलापूर आदी महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींनीही अत्यंत देखण्या शैलीत शास्त्रीय नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

महोत्सवाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि कलाभिमुख वातावरणात झाले असून, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांच्या कलेची समर्पितता आणि विद्यापीठ स्तरावरील नृत्यकलेच्या वाढत्या व्याप्तीचे दर्शन घडले. युवा महोत्सवाचे हे शास्त्रीय नृत्य सत्र म्हणजे परंपरेला स्पर्श करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.








