सोलापूर : समाजाची पाण्याची तहान भागविणे हे महान कार्य आहे. अत्यंत प्रामाणिक कंडक्टर रामचंद्र आवताडे यांच्या स्मरणार्थ हा समाज उपयोगी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून असे उपक्रम आवताडे परिवाराकडून राबविले जात असून हे निश्चित सर्वांसाठीच प्रेरणादायी कार्य आहे, असे प्रतिपादन उद्योजक जयदीप रत्नपारखी यांनी केले.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील कै. रामचंद्र विठोबा आवताडे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छ पाण्याचा नितळ उपक्रमाअंतर्गत सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आर.ओ. फिल्टर पाणी मशीनचा उद्घाटन समारंभ आज उद्योजक जयदीप रत्नपारखी आणि मोना रत्नपारखी यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील हे होते. यावेळी विचारमंचावर एक्साईज विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश आवताडे, कै. रामचंद्र विठोबा आवताडे बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सपना आवताडे, खजिनदार ब्रह्मदेव माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश आवताडे म्हणाले, वडील कै. रामचंद्र आवताडे यांनी एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यांच्या कार्याचा आदर्श वारसा पुढे ठेवत एसटी कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी एसटी स्टँडवर शुद्ध पाण्याची सोय हा उपक्रम आतापर्यंत चार ठिकाणी राबविला आहे. पत्रकार बांधवांसाठीही पाणी फिल्टर मशीन सोय केली आहे. समाजाच्या व्यथा, वेदना, अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी संस्था प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात काशिनाथ पाटील यांनी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही जाणीव ठेवून वडिलांच्या स्मरणार्थ आवताडे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे, ही सर्वांसाठी प्रेरक बाब आहे. यावेळी अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष आफताब शेख यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.












