सोलापूर, दि. १४- विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क (UDRF) समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध विभागांची सोमवार आणि मंगळवारी पाहणी केली. समितीने विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व सहशैक्षणिक संधींचा सखोल आढावा घेतला.
समितीच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या विविध अध्यापन व संशोधन विभागांना भेटी देत संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा केली. त्यांनी विभागांमध्ये सुरु असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती जाणून घेतली, तसेच गुणवत्तात्मक सुधारणांबाबत सूचना दिल्या.

समितीत शिक्षण व संशोधन क्षेत्रातील विविध तज्ञांचा समावेश होता. त्यांनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, भविष्यातील गुणवत्ता सुधारणा व नवनवीन उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दृष्टीने ही समितीची भेट एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मूल्यांकनात तिचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या समितीमध्ये मुंबईच्या डीटीएसएस कॉलेजचे डॉ. एम. एस. कुऱ्हाडे (अध्यक्ष) व सदस्य म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील डॉ. कृष्णन चैतन्य, डॉ. दत्ता खंदारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ. तुकाराम रोंगटे या तज्ज्ञांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांचाही सहभाग
या पाहणीदरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या एकूण प्रगतीचा आणि शैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा समितीसमोर सादर केला. अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी समितीच्या भेटीसाठी आवश्यक त्या सर्व नियोजनाची जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात समितीचे स्वागत करत सादरीकरण सत्र देखील सादर केले. या उपक्रमातून विद्यापीठातील वस्तीगृहातील विद्यार्थिनींनी सहभागाची सकारात्मक बाजू समितीसमोर प्रभावीपणे मांडली गेली.








