सोलापूर : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण दरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने गुरुवारी सोलापुरात भव्य जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे ४०० वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत केंद्र व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला. घोषणाबाजी, फलक आणि संविधान बचावाच्या संदेशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
मोर्चाची सुरुवात सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करण्यात आली. त्यानंतर सिव्हिल चौक, पांगळ हायस्कूल, जिल्हा परिषद पूनम गेट या प्रमुख मार्गावरून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात मोर्चा पार पडला. आंदोलनात सहभागी झालेल्या वकिलांनी हातात “लोकशाहीवर लाठीचा प्रहार, आम्ही करतो तीव्र निषेध”, “विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही”, “संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा निषेध”, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या प्रवृत्तींचा धिक्कार” अशा आशयाचे फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी उपस्थित वकिलांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततेच्या आणि संविधानिक चौकटीत सुरू असताना त्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या बलप्रयोगाचा निषेध केला. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून, तो दडपण्याचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वकिलांनी आपली भूमिका मांडली. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि कायद्याचे राज्य या मूल्यांचे संरक्षण करणे ही न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्याय, दडपशाही आणि संविधानविरोधी कृत्यांविरोधात भविष्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू राहील. नागरिकांचे मूलभूत हक्क अबाधित राहावेत आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी विधी मंच सातत्याने लढा देत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध बार असोसिएशनचे वकील, विधी क्षेत्रातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनामुळे काही काळ परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले.