No Result
View All Result
राष्ट्रीय क्रीडा दिनी डॉ. अनिल राव यांचे प्रतिपादन; गुणवंत खेळाडूंचा गौरव
सोलापूर, : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध अभ्यासक्रमांमध्ये ‘क्रीडा’ विषयाचा मुख्य घटक म्हणून समावेश करावा. क्रीडा विषयाला श्रेयांक आधारित अथवा अनिवार्य स्वरूप दिल्यास अधिकाधिक विद्यार्थी मैदानी खेळांकडे वळतील. त्यातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० सुकाणू समितीचे सदस्य डॉ. अनिल राव यांनी केले. पण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर होते. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे क्रीडा संचालक, मार्गदर्शक, शिक्षक व पत्रकारांसह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
डॉ. राव म्हणाले, बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. शिक्षणासोबत खेळालाही तितकेच महत्त्व मिळायला हवे. विद्यापीठांनी विविध अभ्यासक्रमांत क्रीडा विषयाचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठीही क्रीडा महत्त्वाची भूमिका बजावते. प्रमुख पाहुणे डॉ. सिंकु कुमार सिंग यांनी डिजिटल युगातील तरुणांनी मोबाईल गेमिंगमध्ये अडकून न राहता मैदानी खेळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मैदानी खेळांमुळे शारीरिक क्षमता वाढण्याबरोबरच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर यांनी विद्यापीठातील क्रीडा सुविधा अधिक अद्ययावत करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी केले. डॉ. शिवाजी शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजेंद्र वडजे यांनी आभार मानले. डॉ. तेजस्विनी कांबळे आणि श्रुती देवळे यांनी सूत्रसंचालन केले.
क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान ; क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. मल्लिकार्जुन पाटील, संतोष खेंडे, राहुल हजारे आणि क्रीडा पत्रकार विरेश अंगडी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह महिला महोत्सवातील विजेते कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
No Result
View All Result