सोलापूर, . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन करावे, डीजेचा वापर टाळावा तसेच सामाजिक सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिल्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक झाली. बैठकीत शांतता समिती सदस्य, तज्ज्ञ नागरिक, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. गणेशोत्सव काळात मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी. मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांशपेक्षा अधिक भाग व्यापू नये. मोकाट जनावरांपासून मूर्तीला धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत. उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रबोधन, स्वच्छता, जनसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता आणि सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करणारे संदेश देण्याचे आवाहनही करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून, मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी. विद्युत रोषणाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घेण्यासह चालकांकडे वैध परवाना असणे आवश्यक आहे. मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ थांबवू नये, गुलाल किंवा रंग फेकू नये तसेच इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज, फोटो, पोस्ट किंवा व्हायरल मजकूर प्रसारित होणार नाही याची मंडळांनी खबरदारी घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परवानग्या वेळेत घेण्याचे आवाहनही करण्यात आले. उत्सवादरम्यान अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी मांडलेल्या अडीअडचणी व सूचनांची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित महानगरपालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्तालय तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांना त्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस पोलीस उपायुक्त वृंदा जैन, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रिया राजकुमार, सहायक पोलीस आयुक्त रुही, सहायक पोलीस आयुक्त विजय कवडे यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शांतता समिती सदस्य व पत्रकार उपस्थित होते.