‘सिव्हिल’चा सर्जरी वॉर्ड की रुग्णांचा छळवाडा? प्रशासनाला जाब कोण विचारणार?
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील सर्जरी विभागातील गैरसोयींचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने वॉर्डच्या परिसरातच रुग्णांना अक्षरशः दाटीवाटीत उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना उपचारांबरोबरच मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सर्जरी विभागात रुग्णसंख्या मोठी असताना त्यानुसार खाटांची व्यवस्था करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. काही रुग्णांना वॉर्डमध्ये जागा मिळत नसल्याने उपलब्ध जागेतच बेड लावून उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांची गोपनीयता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
रुग्णालय मोठे; पण नियोजन कोठे ?: शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणारा बहुतांश रुग्ण हा आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील असतो. अशा रुग्णांना चांगले उपचार आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयातील परिस्थिती पाहता ‘सुविधा वाढविण्याच्या घोषणा आणि जमिनीवरील वास्तव’ यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते.
खाटा वाढविण्याऐवजी रुग्णांचीच कोंडी! ; रुग्णसंख्या वाढत असल्याचे प्रशासनाला माहीत असतानाही त्यानुसार बेड व्यवस्थापन, मनुष्यबळ आणि वॉर्ड नियोजन का केले जात नाही, असा सवाल आता रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णालय प्रशासन नेमके कोणत्या क्षणी जागे होणार? एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच उपाययोजना होणार का? असा संतप्त सवालही केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी; वातानुकूलित कार्यालयात बसून व्यवस्थेचे नियोजन करण्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा सर्जरी वॉर्डमध्ये प्रत्यक्ष फेरफटका मारावा. रुग्णांना कोणत्या परिस्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत, याची वस्तुस्थिती त्यांना तेव्हाच समजेल. रुग्णालयातील गैरसोयी दूर करून पुरेशा खाटा, स्वच्छता आणि सुरक्षित उपचार व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.










