No Result
View All Result
विवेकानंद केंद्रातर्फे १२ सप्टेंबरला रंगभवनमध्ये व्याख्यान; विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजन
सोलापूर, : विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या सोलापूर शाखेतर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री तथा अध्यात्म अभ्यासिका स्मिता जयकर यांचे ‘अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजता श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती विवेकानंद केंद्र सोलापूर शाखेचे नगरप्रमुख रवि कंटली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान’ हे ब्रीद घेऊन विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ही अध्यात्मप्रेरित सेवाभावी संघटना देशभरात कार्यरत आहे. देशभरातील ११०० हून अधिक शाखा आणि विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माण, समाजप्रबोधन आणि राष्ट्रनिर्माणाचे कार्य केंद्राकडून केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण करून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगासमोर मांडला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ विवेकानंद केंद्रातर्फे दरवर्षी ‘विश्वबंधुत्व दिन’ साजरा केला जातो.
यंदा विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने सोलापूरकरांसाठी अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनय क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीबरोबरच अध्यात्माचा अभ्यास असलेल्या जयकर या ‘अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रम्या कन्नन राहणार आहेत. शहरातील नागरिक, युवक-युवती आणि अध्यात्मप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवेकानंद केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला संचालक दीपक पाटील, महेश गोंजारी, पंडित बिराजदार, पेंटप्पा गड्डम, शरणू डोंगराजे आदी उपस्थित होते.
No Result
View All Result