सोलापूर : डफरीन चौकातील पु. ना. गाडगीळ ॲड सन्सच्या झपुर्झा आर्ट गॅलरीत प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांच्या मातोश्री चंचला खरात यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साही वातावरणात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार , कलाप्रेमी उद्योजक किशोर चंडक, आस्था रोटी बॅंकेचे संस्थापक विजय छंचुरे आदी उपस्थित होते. यावेळी सचिन खरात, चंचला खरात, आनंद खरात आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, चंचला खरात यांच्या चित्रकलेत आशीर्वाद आणि आविष्काराचा मिलाफ आहे. या चित्रातून नव्या संकल्पना मांडल्या आहेत. अतिशय कल्पकतेने आकर्षक आणि मनोहारी अशी चित्रे रेखाटली आहेत. उद्योजक किशोर चंडक म्हणाले, ज्याप्रमाणे अभिमान्यूला गर्भातच चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण मिळाले होते त्याप्रमाणे सचिन खरात यांची कला मातोश्री चंचला खरात यांच्याकडून आली आहे.चंचला खरात यांची चित्रे पाहिल्यानंतर सचिन खरात यांच्या कलेचा उगम लक्षात येतो. यावेळी ऋतुज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
- या चित्रांसाठी चंचला खरात यांनी कोणाचेही मार्गदर्शन घेतले नाही. सचिन खरात यांच्या चित्रकलेनंतर उर्वरित रंग व कॅनव्हॉसचा वापर त्यांनी केलेला आहे. यासाठी त्यांनी नवीन रंग वापरले नाहीत. विशेष म्हणजे कोणतेही दोन रंग एकत्र करून रंगाचा वापर त्यांनी केला नाही. चित्र रंगविण्यापूर्वी कधीही स्केच काढले नाही. थेट ब्रशने चित्रे रंगविण्यात आली आहेत.











