सोलापूर, दि. ५- महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांचीच सखोल चौकशी करून यातील सर्वच दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले.



रविवारी, तटकरे हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन करून सोलापुरात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या सुपर मार्केट येथील शहर कार्यालयास भेट दिली. तेथे शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भोंदूद्वावा अशोक खरात याचे विविध कारनामे दिवसागणिक चर्चेत येत आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने जलद गतीने तपास पूर्ण करावा, अशी मागणी करीत या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा संबंध आढळून येईल, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले आहेत. आता काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न करू, असेही तटकरे म्हणाले. यावेळी आनंद चंदनशिवे, चंद्रकांत दायमा, आनंद मुस्तारे, वसीम बुन्हाण, प्रमोद भोसले, वैभव हत्तुरे, प्रकाश जाधव, बसवराज कोळी उपस्थित होते.










