सोलापूर, :सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार, दि. ८ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेमधील शिवरत्न सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान स्थायी समितीचे अध्यक्ष दीपक वैद्य भूषविणार आहेत.
सभेत मागील स्थायी समितीच्या इतिवृत्तास मान्यता देण्याबरोबरच शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध परिपत्रकांचे आणि निर्णयांचे वाचन करून अधिकृत नोंद घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामांची सद्यस्थिती तपासून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात येणार आहेत.

तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर झालेल्या खर्चास मान्यता देण्याबाबत सविस्तर विचारविनिमय होणार आहे. विविध योजनांवरील आर्थिक तरतुदींचा आढावा घेत निधीच्या योग्य वापरावर भर दिला जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास निधीअंतर्गत करण्यात आलेल्या खर्चाची माहितीही सभेत सादर करण्यात येणार असून त्या खर्चास मंजुरी देण्याचा विषयही चर्चेत राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.










