सोलापुरात सायबर फसवणुकीचा नवा फंडा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
सोलापूर ; सोलापूर जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता थेट जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची ओळख वापरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सायबर गुन्हेगारांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांचा फोटो आणि नाव वापरून 84858276088 या क्रमांकावरून फेक व्हॉट्सअॅप अकाउंट तयार केले आहे. या माध्यमातून नागरिकांची फसवणूक, आर्थिक व्यवहार किंवा संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराची माहिती स्वतः जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे सार्वजनिक केली. संबंधित क्रमांकावरून येणारे संदेश, कॉल किंवा आर्थिक मागण्यांकडे दुर्लक्ष करावे, कोणतीही वैयक्तिक अथवा बँकविषयक माहिती शेअर करू नये तसेच संबंधित नंबर तात्काळ ब्लॉक करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावानेही अशाच प्रकारे बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचाही गैरवापर झाल्याने सायबर गुन्हेगार थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्हेगारांकडून अधिकाऱ्यांचे फोटो, नाव आणि पदाचा वापर करून विश्वास निर्माण केला जात आहे. त्यानंतर पैशांची मागणी, ओटीपी, बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत आणि संशयास्पद प्रकार तात्काळ सायबर पोलिसांच्या निदर्शनास आणावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










