No Result
View All Result
सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यंदा प्रथमच ‘अँटी ड्रोनगन’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यात या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी विविध संतांच्या पालख्यांसह पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारीचे चित्रण करण्यासाठी अनेकदा खाजगी ड्रोन आकाशात उडविले जातात.
अशा अनधिकृत ड्रोनमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून अँटी ड्रोनगन प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे.या प्रणालीचे कार्य, वापरण्याची पद्धत आणि आपत्कालीन परिस्थितीत तिचा प्रभावी उपयोग कसा करायचा, याबाबत सोमवारी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक त्या सूचना देत आषाढी वारीदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या.यंदाच्या वारीत पारंपरिक पोलिस बंदोबस्तासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
No Result
View All Result