सोलापूर : कान, नाक व घसा हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव असून, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून तसेच मोबाइलचा मर्यादित वापर करून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज किमान एक तास तरी द्यावा, असे आवाहन जागतिक किर्तीचे नेत्रशल्यचिकित्सक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.रविवारी, होटगी रोडवरील अंत्रोळीकरनगर परिसरात अलकानंद कान, नाक, घसा (ईएनटी) हॉस्पिटल व आधुनिक दंतोपचार केंद्राच्या स्थलांतरित नवीन वास्तूचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, महाराष्ट्र राज्य ईएनटी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, लातूरचे प्रसिद्ध ईएनटी तज्ज्ञ डॉ. मधुसूदन मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रा. डॉ. आनंद हुली यांनी केले, तर प्रास्ताविकात हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. दीपेंद्र हुली यांनी तीन वर्षांपूर्वी एक हजार चौरस फुटांच्या जागेत सुरू झालेला दवाखाना आज स्वतः च्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाल्याची माहिती दिली. रुग्णकुटुंबीय आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे हा प्रवास शक्य झाल्याचे सांगत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.डॉ. लहाने यांनी अलकानंद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक करत, त्याचा सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना मोठा लाभहोईल, असा विश्वास व्यक्त केला.
तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण, तर मोबाइलमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने या दोन्ही गोष्टींचे व्यसन टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच दात काढल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होतो हा केवळ गैरसमज असून, दात व डोळ्यांच्या नसा वेगळ्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. काळे यांनी आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि दर्जेदार आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. पुष्पराज काडादी यांनी या हॉस्पिटलमुळे नागरिकांना एकाच छताखाली कान, नाक, घसा व दंतोपचाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने सोलापुरातील रुग्णांची चांगली सोय होईल, असे नमूद केले.
डॉ. मधुसूदन मालपाणी यांनी रुग्णसेवा, मानवता आणि नैतिकतेचे केंद्र म्हणून हे हॉस्पिटल विकसित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, यावेळी अलकानंद हॉस्पिटल आणि अश्विनी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उद्घाटन सोहळ्यास अलका हुली, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, सुनीता बिराजदार, शशांक बिराजदार, अदिती बिराजदार, डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर यांनी केले, तर डॉ. रेवती हुली यांनी आभार मानले.