No Result
View All Result
सोलापूर, : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू असून, शनिवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९२ हजार ४६५ क्युसेक्स पाण्याची नोंद झाली. वाढत्या आवकेमुळे धरणातील पाण्याचा विसर्गही कायम ठेवण्यात आला असून भीमा नदीपात्रात एकूण ८१ हजार ६०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणाच्या १६ दरवाजांतून ८० हजार क्युसेक्स आणि जलविद्युत केंद्रातून १ हजार ६०० क्युसेक्स असा एकूण विसर्ग सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी ४९६.७२५ मीटरवर पोहोचली असून, धरणातील एकूण पाणीसाठा ११५.९९ टीएमसी झाला आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा ५२.३३ टीएमसी असून तो ९७.६८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, दौंड नदी मापन केंद्रावरून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. त्याचबरोबर सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहीगाव उपसा सिंचन योजना, बोगदा तसेच मुख्य कालव्याद्वारेही नियोजनानुसार पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने पुढील काही दिवस आवक वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No Result
View All Result