सोलपूर : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोलापूर जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून ‘स्वतंत्र सोलापूर’च्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव करण्यात आला. जलसंधारण दिनानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट ते २६ जानेवारीदरम्यान जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या संकल्पनेतून नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील २६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची यादी तयार झाली असून आधार सीडिंगनंतर लाभ थेट खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी चार हजार कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून आषाढी वारीत ३२ लाख भाविकांना सुविधा देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाली असून शहरातील उड्डाणपुलासाठी जागा हस्तांतरणाची ९३ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १,४७८ कोटींच्या जलपुरवठा प्रकल्पामुळे २०६० पर्यंत प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, मोदी व अहिल्यादेवी होळकर योजनांतील १.८३ लाख घरकुलांपैकी ८५ हजार घरकुले पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेसाठी ९९१ कोटींचा निधी मंजूर झाला असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ३.० मध्ये सोलापूरची निवड झाली आहे. अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी १५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी, सामाजिक समतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन गोरे यांनी केले. समारंभाच्या प्रारंभी वंदे मातरम्, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले. त्यानंतर तंबाखूमुक्ती आणि जलसंधारण दिनाची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.