No Result
View All Result
सोलापूर : सोलापूरकरांच्या सार्वजनिक वाहतुकीला आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने पीएम ई-बस योजनेंतर्गत शहरासाठी आलेल्या २० इलेक्ट्रिक बसेस सध्या ‘रेडी टू रन’ स्थितीत नसून विविध तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हरियाणातून सोलापुरात दाखल झालेल्या या बसेस आजळा एक्झिबिशन ग्राउंडजवळील दत्तमणी नगर परिसरातील मैदानात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत बसेस सोलापुरात दाखल झाल्या असल्या तरी त्यांचा अधिकृत ताबा अद्याप महापालिका अथवा परिवहन उपक्रमाकडे देण्यात आलेला नाही. संबंधित जेबीएम कंपनीकडून बसेसची पीडीआय (Pre-Delivery Inspection) प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या बसेस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी आणखी काही प्रक्रिया बाकी आहेत.
दरम्यान, बसेस ठेवण्यात आलेल्या ठिकाणी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसा कंपनीचे दोन सुरक्षा रक्षक, तर रात्री जेबीएम कंपनीचे दोन आणि महापालिकेचे दोन असे चार सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जात असून, वाहनांच्या सुरक्षेवरही लक्ष ठेवले जात आहे. तसेच जीपीआरएसच्या माध्यमातून दर दोन तासांनी आवश्यक माहिती कंपनीला पाठविली जात आहे.
महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचन यन्नम आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत जाधव यांनी ई-बसेस ठेवलेल्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बसेसची सद्यस्थिती, पीडीआयची प्रगती, सुरक्षाव्यवस्था आणि देखभालीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पाहणीदरम्यान काही उपकरणे व लॅम्पच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर संबंधितांकडून खुलासा घेण्यात आला. वाहतुकीदरम्यान काही उपकरणे किंवा लॅम्प पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले असून, बसेसमधून चोरी झाल्याचे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ई-बसेस शहरात दाखल झाल्यानंतर आता त्यांना प्रत्यक्ष सेवेत आणण्यासाठी बुधवार पेठ येथील डेपोची उर्वरित कामे पूर्ण करण्याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांनी डेपोला भेट देऊन सिव्हिल कामे, चार्जिंग व्यवस्था, वॉशिंग एरिया आणि वर्कशॉपच्या कामांचा आढावा घेतला. ई-बसेसच्या संचालनासाठी चार्जिंग स्लॉट अत्यावश्यक असल्याने ते बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी जेबीएम कंपनीशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
ई-बसेस रस्त्यावर आणण्यापूर्वी चार्जिंगची व्यवस्था, देखभाल केंद्र आणि धुलाई व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ बसेस सोलापुरात आणण्यापेक्षा त्यांना नियमितपणे चालविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर दिला जात आहे. पीडीआय, रजिस्ट्रेशन आणि डेपोतील उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतरच या २० ई-बसेसचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील ई-बस सेवा नेमकी कधीपासून सुरू होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No Result
View All Result