सोलापूर : माल वाहतुकीच्या नावाखाली तब्बल ५ लाख ५४ हजार २५८ रुपये किमतीच्या पी.व्ही.सी. पॅनल पट्ट्यांची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला एम.आय.डी.सी. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अक्कलकोट रोड परिसरातून अटक केली. प्रतिक निंबाळकर (वय २६, रा. गोपाळवाडी, दौंड, जि. पुणे, सध्या रा. बारामती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला सुमारे १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक, ६५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि चोरीस गेलेला पी.व्ही.सी. पॅनलचा संपूर्ण माल असा एकूण २१ लाख १९ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परवेज महोळकर यांनी ३१ जुलै रोजी पी.व्ही.सी. पॅनलचा माल विजयपूर येथे पोहोचविण्यासाठी निंबाळकर याच्या ट्रकमध्ये भरून दिला होता. माल घेऊन निघाल्यानंतर आरोपीने तो निर्धारित ठिकाणी पोहोचविण्याऐवजी मध्येच त्याची परस्पर विल्हेवाट लावली. माल पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आरोपीच्या हालचालींबाबत गोपनीय माहितीही संकलित करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी ट्रकचा वापर करून पुन्हा परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल. टॉवरजवळील सर्व्हिस रोडवर बनावट नंबरप्लेट लावलेला आयशर ट्रक घेऊन संशयित थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीला हालचाल करण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर पोलिसांनी ट्रकसह चोरीस गेलेला माल आणि दोन मोबाईल फोन ताब्यात घेतले. आरोपीने मालाची विल्हेवाट कशी लावली, या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट नंबरप्लेटचा वापर का करण्यात आला, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तसेच पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे आणि सकलेन मुकादम यांच्या पथकाने केली