सोलापूर | राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि कृषी क्षेत्रातील नव्या संधींची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी-२०२६’ या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ कृतज्ञता शेतकरी मेळावा आणि सत्कार समारंभालाही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, कृषी तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. ‘कृषी पंढरी-२०२६’च्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, बाजारपेठेतील संधी, मूल्यवर्धन प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
यावेळी आयोजित कृतज्ञता शेतकरी मेळाव्यात कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, आधुनिक शेतीचा स्वीकार वाढविणे आणि कृषी क्षेत्रात नवकल्पनांना चालना देणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी नवकल्पनांचे सादरीकरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतकरी सक्षमीकरणावर भर देणाऱ्या या महोत्सवाला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.