सोलापूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांना पदोन्नतीचा बहुमान मिळाला असून त्यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई विभागाच्या अधीक्षक अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सात कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती दिली असून त्यामध्ये कुलकर्णी यांचा समावेश आहे.
संतोष कुलकर्णी यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यरत असताना अनेक विकासकामे प्रभावीपणे मार्गी लावली. यापूर्वी त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सोलापूर कार्यालयात बदली झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा जिल्हा परिषदेत नियुक्ती मिळवत विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दीर्घकाळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने त्यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनुभवी आणि अभ्यासू अधिकाऱ्याची उणीव भासणार असली, तरी त्यांच्या पदोन्नतीबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पदोन्नतीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संतोष कुलकर्णी यांचे अभिनंदन करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.