सोलापूर : आई-वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंतच. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक, आई गृहिणी, तर आजी आजही शेतात राबणारी. अशा साध्या, कष्टकरी कुटुंबातील जुळ्या भावंडांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत जिद्दीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
स्नेहा माळगे हिने ९१.२० टक्के, तर तिचा जुळा भाऊ समर्थ माळगे याने ७७ टक्के गुण मिळवत दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. स्नेहा हिने श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला, तर समर्थ याने श्री सिद्धेश्वर प्रशाला येथे पहिलीपासून शिक्षण घेतले. घरातील परिस्थिती साधी असली तरी शिक्षणाबाबत कुटुंबाने कधीही तडजोड केली नाही. वडील नोकरीनिमित्त दिवसभर कामात व्यस्त असायचे.
शिकवणी न लावता स्व-अभ्यासावरच भर
आई रुपाली माळगे घरची जबाबदारी सांभाळून सासू रत्नाबाई माळगे यांना मदत करण्यासाठी मूळ गावी दोड्याळ (ता. अक्कलकोट) येथे शेतकामासाठी जात असत. अशा परिस्थितीतही दोन्ही भावंडे दररोज रिक्षाने शाळेत जाऊन अभ्यासात सातत्य ठेवत राहिली. खाजगी शिकवणी न लावता स्व- अभ्यासावरच त्या दोघांनी भर दिला. कष्ट, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे माळगे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. दोघांच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते मल्लिनाथ करपे यांच्यासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












