सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शिवदर्शन या शासकीय निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. गणरायाच्या आगमनाने जिल्हाधिकारी निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या पत्नी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, त्यांचे वडील सेतू रामन आणि आई विजयालक्ष्मी उपस्थित होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत गणरायाची पूजा-अर्चा व आरती करण्यात आली.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असून पर्यावरणाची काळजी घेत हा उत्सव साजरा करण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले. गणरायाच्या चरणी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सुख, शांती, उत्तम आरोग्य व समृद्धी लाभावी, तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.