विंचूर : भारतीय संस्कृती आणि साहित्यविश्वाला रामायणासारखा महान ग्रंथ देणारे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती दक्षिण सोलापूर तालुकयातील विंचूर येथे श्री पंचाक्षरी विद्यामंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकींच्या महान साहित्यिक कार्याचे स्मरण करीत विद्यार्थ्यांना ज्ञान, सदाचार, सत्यनिष्ठा आणि आदर्श जीवनमूल्यांची शिकवण देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक ए. बी. लिगाडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. ए. मुटाळे यांनी केले. यावेळी के. पी. म्हमाणे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत भारतीय साहित्य आणि संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले रामायण हे केवळ महाकाव्य नसून मानवी जीवनाला दिशा देणारा आदर्श मूल्यांचा अनमोल ठेवा आहे. सत्य, कर्तव्यनिष्ठा, त्याग, सदाचार आणि नैतिकतेचा संदेश देणारे त्यांचे साहित्य आजच्या पिढीसाठीही तितकेच मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता महापुरुषांचे विचार आणि आदर्श आपल्या आचरणात उतरवावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचा जागर करीत प्रेरणादायी वातावरणात जयंती उत्सवाची सांगता झाली