सोलापूर : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केवळ कायद्याची कठोर अंमलबजावणी पुरेशी नसून, नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या घोषणेनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये कामे करून देण्यासाठी लाचेची मागणी होत असल्यास किंवा राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतलेले आढळल्यास नागरिकांनी गप्प न बसता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन मुंबईचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांनी केले आहे.
भ्रष्टाचार ही केवळ प्रशासकीय समस्या नसून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. शासकीय योजनांचा लाभ, विविध दाखले, परवानग्या तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी नागरिकांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. भ्रष्टाचाराच्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्याविरोधात तक्रार करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविणे सुलभ व्हावे, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध संपर्क सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. टोल फ्री क्रमांक, दूरध्वनी, व्हॉट्सॲप, ई-मेल तसेच अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना विभागाशी संपर्क साधता येणार आहे.भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी सजग राहून संशयास्पद प्रकारांची माहिती संबंधित यंत्रणेला द्यावी. लाच मागितल्यास ती देण्याऐवजी कायदेशीर मार्गाने तक्रार करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे