सोलापूर : यंदा पावसाळ्यातील पहिले नक्षत्र मृगपासून ते आज निघालेल्या शेवटच्या स्वाती नक्षत्रापर्यंत पावसाने प्रचंड निराशा केली आहे. नक्षत्रांवर नक्षत्रे फक्त बदलत राहिली, प्रत्यक्षात मुसळधार पाऊस काही आला नाही. पावसाची वाट पाहण्यात संपूर्ण पावसाळा संपला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या वादळामुळे सोलापूर जिल्ह्यात मंगळवार ते गुरुवार दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने खरिपाची पिके जागेवरून करपून गेली आहेत. रब्बीच्या पेरण्या पावसाअभावी ठप्प आहेत. शनिवारी (ता. २४) सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश झाला.
शुक्रवारी सोलापुरात ३६.८ कमाल तर २३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. आर्द्रता ४२ टक्क्यांवर होती. शनिवारी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस होते. आर्द्रता ४३ टक्के होते. आज (रविवारी) कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस, किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. आर्द्रता ३६ टक्क्यांवर आली होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल व किमान तापमानात घट व आर्द्रतेत चढ-उतार झाली होती.
सोलापूर जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या झाल्यानंतर स्वाती नक्षत्रात हमखास पाऊस होतोच. या पावसावरच शेतकऱ्यांचे ज्वारीसह इतर रब्बीची पिके येत असल्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ ही म्हण सोलापूरच्या ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. यावर्षी पेरण्याच नगण्य झाल्याने स्वाती नक्षत्रातील पावसावर रब्बीच्या पेरण्या अवलंबून असणार आहेत. याही नक्षत्रातील पावसाने दगा दिल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.