सामनावार संजू सॅमसन ; 97 धावा ,50 चेंडू , 12 चौकार, 4 षटकार
कोलकाता : यजमान भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना रविवारी वेस्ट इंडिजचा ५ गड्यांनी पराभव केला. धडाकेबाज संजू सॅमसनने शानदार अर्धशतक झळकावत भारताचा विजय साकारला. वेस्ट इंडिजला २० षटकांत ४ बाद १९५ धावांवर रोखल्यानंतर भारताने १९.२ षटकांत ५ बाद १९९ धावा केल्या. भारतीय संघ गुरूवारी वानखेडे स्टेडियमवर उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध भिडेल.
सलामीवीर सॅमसनने अखेरपर्यंत किल्ला लढवताना ५० चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९७ धावा फटकावल्या. त्याने विक्रमी खेळी करताना टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. परंतु, सॅमसनने एकाबाजूने खंबीरपणे फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने तिसऱ्या गड्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत ३५ चेंडूंत ५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.



त्याआधी, जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेल यांनी पाचव्या गड्यासाठी ३५ चेंडूंत नाबाद ७६ धावांची शानदार भागीदारी करत विंडीजला भक्कम धावसंख्या उभारून दिली. विंडीजला भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचाही फायदा झाला. कर्णधार शाय होप (३३ चेंडूंत ३२ धावा) आणि रोस्टन चेज (२५ चेंडूंत ४०) यांनी ५३ चेंडूंत ६८ धावांची सलामी दिली. पाचव्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने चेजचा झेल सोडला. यावेळी चेज १४ धावांवर खेळत होता. वरूण चक्रवर्तीने नवव्या षटकात होपला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर विंडीजने ठरावीक अंतराने बळी गमावले. परंतु, होल्डर-पॉवेल यांनी सामन्याचे चित्र बदलताना शानदार फटकेबाजी केली. १९व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा अभिषेकने २७धावांवर खेळत असलेल्या पॉवेलचा ड्रोल सोडला. होल्डरने २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३७, तर पॉवेलने १९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने २, तर हार्दिक पांड्या व वरूण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला


मी १० वर्षांत ५०-६० सामने खेळलो आणि १०० बाहेर बसून पहिले..
ज्या दिवसापासून मी खेळायला सुरुवात केली, त्या दिवसापासून मी माझ्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले, हीच ती खेळी होतो ज्याची मी वाट पाहत होतो. माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत, स्वतःवर शंका होती, मी ते करू शकेन का असा प्रश्न पडला होता, पण आज मी देवाचे आभार मानतो. मी १० वर्षांपासून भारतासाठी खेळत आहे.संजू सैमसन










