बिनविरोध निवड! सोलापूर पालिकेत चाकोते युगाचा प्रारंभ.
सोलापूर : सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांचे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अठरा मिनिटांच्या निवड प्रक्रियेनंतर चाकोते यांचा एकमेव अर्ज असल्याने पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यानंतर महापालिका आवारात क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून तसेच चार जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करत पर्यावरण पूरक जल्लोष साजरा करण्यात आला.
सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीची सभा पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची उपस्थिती होती. पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्याकडे सभापती पदासाठी दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्र महापालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी सादर केले.
भाजपच्या रंजीता चाकोते यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. पिठासीन अधिकारी यांनी छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सकाळी 11: 03 वाजता पिठासीन अधिकारी यांनी सभेच्या नियमाप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी सकाळी ठीक 11.18 वाजता विहित वेळेत अर्ज मागे घेतला नाही. सभापती पदासाठी चाकोते यांचा एकच अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे मतदान घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे रंजीता चाकोते यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात येत असल्याची घोषणा पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केली. त्यानंतर उपस्थित स्थायी समिती सदस्यांनी या निवडीचे स्वागत केले.सभापतीपदी बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर रंजीता चाकोते यांचा महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर , महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे , स्थायी समिती सदस्य, नगरसेवक- नगरसेविका यांच्यासह नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान, यावेळी महापालिका आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हे आहेत स्थायी समितीचे १६ सदस्य सत्ताधारी भाजपच्या १४ जणांपैकी चाकोते यांना चेअरमन पदाची संधी मिळाली आहे. भाजपचे १४, एमआयएमचा आणि शिंदे सेनेचा प्रत्येकी एक असे स्थायी समितीमध्ये पक्षीय बलाबल आहे. भाजपचे अविनाश पाटील, सतीश सिरसीला, रंजीता चाकोते, गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजू पाटील, अमर पुदाले , बिज्जू प्रधाने तर एमआयएमचे अझहर हुंडेकरी आणि शिवसेनेचे अमोल शिंदे आदी स्थायी समिती सदस्य आहेत.