सोलापूर : दहावी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. यामुळे या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार? याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यात सध्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात उद्या म्हणजे 18 मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर होता. पण या पेपरच्या 50 प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर या परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. आज सकाळी 8.30 वा. शिक्षण विभाग व कस्टोडियन कालचे उरलेले पेपर बोर्डाला पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यासाठी आले असता त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसले. तेव्हा ही चोरी निदर्शनास आली. या स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद आहे. त्यामुळे या चोरीचे कोणतेही फुटेज उपलब्ध नाही.
भूगोल विषयाचा पेपर चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डीवायएसपी बसवराज शिवपुजे व स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना केल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलिस अधीक्षकांशीही संवाद साधून या प्रकरणी चर्चा केली.दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
पण अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री केव्हातरी या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका लंपास केल्या. मंगळवारी सकाळी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.”










