सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर विविध विकास कामांसाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीकरिता ८५ कोटी ७० लाख रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाला आहे. ग्रामविकास विभागाकडून हा निधी वितरित करण्यात आला असून, यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निधीचा प्रामुख्याने ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी वापर केला जाणार आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा निधी मैलाचा दगड ठरेल. निधीबाबत बोलताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांनी सांगितले की, “प्राप्त निधीचा वापर अत्यंत पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने केला जाईल, जेणेकरून ग्रामीण जनतेला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल.”

अशी माहिती ग्रामपंचायत विभागाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी माहिती दिली आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष मा. श्री. इंद्रजीत पवार यांनी विश्वास व्यक्त केला की, “१५ व्या वित्त आयोगाच्या निधीमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून, आगामी काळात सर्व विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली जाईल.”









