सोलापूर : सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत केवळ दोन दिवसांत चैन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३३ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेली काळी पल्सर मोटारसायकल, २ मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ५८ हजार ५८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी अवंती नगर परिसरात ६६ वर्षीय गृहिणी विजयालक्ष्मी सावळे या आपल्या मैत्रिणींसोबत पायी चालत जात होत्या. यावेळी विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील ३३ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सलग दोन दिवस बीड येथे जाऊन शोध घेतला. तेथून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, केवळ व्यसनासाठी आणि मौजमजेसाठी पैसे हवे असल्याने या अल्पवयीन मुलांनी हा गुन्हा केला होता.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अवघ्या दोन दिवसांत चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून दिल्याने फिर्यादी महिला आणि नागरिकांनी सोलापूर पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.










