समितीचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांची माहिती
सोलापूर : भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर तर्फे यंदाही अक्षय्य तृतीयेनिमित्त भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जुळे सोलापूर येथील के.एल.ई. स्कूल येथे हा सोहळा पार पडणार असून, त्याच दिवशी म्हणजे १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांनी दिली.
भगवान परशुराम जयंतीच्या दिवशीच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक के.एल.ई. स्कूल येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावर्षीच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित भव्य चित्ररथ असणार आहेत. तसेच ५०० हून अधिक तरुण-तरुणींचा डेसकोडमधील लेझीम पथक मिरवणुकीत रंगत वाढवणार आहे. याशिवाय हजारो महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या एकमेव परशुराम जयंती मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन भगवान परशुराम जयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, स्वागत अध्यक्ष अजय कुलकर्णी, काकासाहेब कुलकर्णी, शर्वरी रानडे, विक्रम ढोनसळे, रवींद्र नाशिककर, आदी उपस्थित होते.










