सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या वाहनप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, अध्यक्ष दीपक वैद्य यांनी “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, इनोव्हा कारसाठी हट्ट करणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून दोन महिने पूर्ण झाले असले, तरी यापूर्वीच्या अध्यक्षांची सफारी गाडी जीर्ण झाल्याने वैद्य यांच्याकडे अधिकृत वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सध्या ते भाड्याच्या इनोव्हा कारचा वापर करत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. कोणती वाहने घ्यायची याचा निर्णयही झाला असून त्यासाठी ऑर्डर देण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘झेडपी अध्यक्षांचा इनोव्हा कारसाठी हट्ट’ अशा आशयाच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपक वैद्य म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवत मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. गाडी कोणतीही असो, मला पदाची जबाबदारी महत्त्वाची आहे.”
ते पुढे म्हणाले, “अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी मंजूर बजेटनुसार महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही घेण्याचे आधीच ठरले आहे. एक्सयूव्हीत बसण्याची संधी मिळणंही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही गाडीसाठी मी हट्ट धरलेला नाही. या स्पष्टीकरणानंतर वाहनप्रकरणी सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.










