सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या विविध संवर्गातील एकूण १०९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी (दि. ४) पदोन्नती देण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या पदोन्नतीमध्ये तांत्रिक संवर्गातील १३, बिगर तांत्रिक संवर्गातील ८५ आणि वर्ग ‘ड’ मधून कनिष्ठ श्रेणी लिपिक पदावर ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच चार खातेप्रमुख, १७ कार्यालय अधीक्षक आणि २३ वरिष्ठ मुख्य लेखनिक यांनाही पदोन्नतीचा लाभ मिळाला.
तांत्रिक संवर्गात सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील व्यंकटेश चौबे आणि बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मठपती यांची कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती करण्यात आली आहे. नीलकंठ मठपती यांची नगररचना कार्यालयात, तर व्यंकटेश चौबे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. व्यंकटेश चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने ८५० कोटी रुपयांच्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. सध्या ४२९ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून त्यानंतर १ हजार ३७८ कोटी रुपयांच्या सुधारित जलवितरण योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे











